Wednesday, 13 June 2018

बुद्ध हे बुद्धीचे भांडार

ज्ञान देउनी अज्ञानाचा दूर करी अंधार 
बुद्ध हे बुद्धीचे भांडार 

तत्त्व हिताची बोध प्रणाली 
वदे जगाला बुद्ध माउली 
सन्मार्गाची देई साउली 
करी धम्म साकार 
बुद्ध हे बुद्धीचे भांडार 

पुरुषोत्तम जणू दूत शांतीचा 
उद्धारक नव विश्व क्रांतीचा 
प्रेरक होऊनि हीन-दीनांचा 
करी जगी उद्धार 
बुद्ध हे बुद्धीचे भांडार 

नश्वर देही दिव्यत्वाने 
अष्टशीलेच्या उपदेशाने 
मानवतेला तथागताने 
दिला दिव्य आकार 
बुद्ध हे बुद्धीचे भांडार 

बाबांच्या लाडक्या मुलांनो

बाबांच्या लाडक्या मुलांनो, घर हे सोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका

काडी काडी जोडून जोडून घरटे हे बनविले
पित्यापरी सांभाळिले अन हक्क मिळवुनी दिले 
घट ज्ञानाचे स्वाधीन केले, घट हे मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका

परिश्रमाची शर्थ करुनी संघटना घडविली
समतेच्या सागरी विषमता कायमची बुडविली
ममतेचे अन बंधुत्त्वाचे, नाते तोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका

नागपूरच्या दीक्षाभूवर केली होती प्रतिज्ञा
कार्यरथाला पुढे न्यायचे स्मरणी असू द्या आज्ञा
शिखर यशाचे चढणारांना, मागे ओढू नका
भीमाची आज्ञा मोडू नका

बाबांच्या लाडक्या मुलांनो, घर हे सोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका

Sunday, 20 May 2018

माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का

सुज्ञानाचा निर्मळ झरा
भीमासारखा माणूस खरा
जन्मा येईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का 
सांगा पुढारी होईल का 

मानापानाला कधीच नाही चुकून हपापणारा
धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा
वादळातली समाज नौका किनारी लावील का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का

करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा
दीनदलितांसाठी दिन रात्री तळमळणारा
भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का

देशविदेशी जनता ज्ञान बघून चकित होई
अशी भीमाची करणी तिला जगात मोलच नाही
अशीच गोधन दीनदलितांची ओझी वाहील का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का

Lyrics: 
गोधन सावंत 
Singer: मिलींद शिंदे 

कुंकू लाविलं रमानं

माझ्या भीमाच्या नावाचं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं, कुंकू लाविलं रमानं

असे मधुर मंजुळ वाणी
ऐका रमाईची कहानी
वागे घरात नेमानं
कुंकू लाविलं रमानं

नाही गेली आज्ञाबाहेर
कधी आठवलं ना माहेर
केला संसार दमानं
कुंकू लाविलं रमानं

नाही केली आशा सोन्याची
करी चिंता सदा धन्याची
ठेवी पतीचा सन्मान
कुंकू लाविलं रमानं

रमा उपवाशी राहिली
दीन दलितांची माऊली
नाव कमविलं श्रमानं
कुंकू लाविलं रमानं




Saturday, 19 May 2018

कोण सकाळी पूर्व दिशेला

कोण सकाळी पूर्व दिशेला
स्वरांजली वाहिते (२)
गाऊनी भीम-बुद्धाची गीते (२)

कोण बरे शीलवंत ही देवी
गाई भीमाची मंजुळ ओवी
कोण माऊली भल्या पहाटे
अंगणी जल शिंपीते

पवित्र जलाने स्नान संपुनी
मिश्र फुलांचे हार गुंफुनी
कोण सुहासिन सौभाग्याचा
गंध-टिळा लाविते

कुणी हे मंगल मंत्र बोलले
बुद्धं सरणं वदत चालले
कोण विनयशील अमुची भगिनी
धम्मपदा वंदिते

जागे करुनी ह्या जनवृन्दा 
पहा निरखूनि काशीनंदा
कोण पुजारीन ह्या शुभसमयी
बुद्धपुजा बांधिते

कोण सकाळी पूर्व दिशेला
स्वरांजली वाहिते
गाऊनी भीम-बुद्धाची गीते

शब्दरचना:  बी. काशीनंद