Sunday, 26 February 2017

उद्धरली कोटी कुळे

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे

एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती
तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती
अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे

जखडबंद पायातील साखळदंड
तडातड तुटले तू ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे

कुजे वृक्ष तैसाच होता समाज
हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज
अमृताची आली फळे, भीमा तुझ्या जन्मामुळे

काल कवडीमोल जीणे वामनचे होते
आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते
बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे

--- लोकशाहीर वामनदादा कर्डक


त्रिसरणाची मंगल वाणी

बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
त्रिसरणाची मंगल वाणी, घुमते मंगलधामी

एक संत असा कुलवंत, कुलवंत आणि शिलवंत
शिलवंताची साथ मिळाली अखेरच्या मुक्कामी

सर्वास मिळावा वाटा, असा ज्ञान धनाचा साठा
ठेवून गेला याच ठिकाणी उभ्या जगाचा स्वामी

ना शोध कुणाचा उसना दुःखाचे कारण तृष्णा
तोड तयावर सांगून गेला महान अंतर्यामी

गाऊन शीलाची गाथा जण म्हणती जाता जाता
इथेच नमतो माथा आता ज्ञान दुजे कुचकामी

आलीरे संधी नामी सांगितले वामनला मी
उचल पोतडी पंचशीलाची येईल आपुल्या कामी

आई म्हणे लेकराला

आई म्हणे लेकराला रे कुलदीपा
हो भीमासारखा, हो भीमासारखा

हाती पाटी घेताना भीमाला स्मरावे
नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे
तुझे मोल कळू दे तुझ्या शिक्षका
हो भीमासारखा, हो भीमासारखा

मंत्र आठवावा भीमाने दिलेला
अभिमान वाटावा महात्मा फुलेला
ऐसे वर्तन करावे तू ज्ञानवर्धका
हो भीमासारखा, हो भीमासारखा

सदा आचरावे धम्म धोरणाला
दुरून हात जोडावे राजकारणाला
तेथे कोणी नसे रे कुणाचा सखा
हो भीमासारखा, हो भीमासारखा

मने प्रेषितांची मायेने रिझावी
अशी काशीनंदा हि लेखणी झिजावी
हेवा वाटो भलेहि तुझ्या स्पर्धका
हो भीमासारखा, हो भीमासारखा

--- काशीनंद

जरी संकटाची काळ रात होती

जरी संकटाची काळ रात होती
तरी भीमराया तुझी साथ होती
तुझी तेवण्याची सुरुवात होती
प्रकाशात माझी पिढी न्हात होती

पालवीत होते प्रकाशाचे गोळे
पालवीत  होते तुझे दोन डोळे
प्रकाशाचे गाणे मनी गात होती
अशी फौज माझी पुढे जात होती

गणतीच माझी गुलामात होती
जिंदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती

मला दावलेली तुझी पायवाट
जाहली आता जी विकासाची वाट
वदे आज वामन कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती

---लोकशाहीर वामनदादा कर्डक

Sunday, 19 February 2017

भीमरायाचा मळा

लयास गेली युगायुगाची हीन दीन अवकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

रानमाळ असता भीमाने देह इथे झिजविला
शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला
बहरली कणसं इमानी माणसं
नाचतो जोंधळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

त्रिसरणाची झडप तयाला कुंपण पंचशीला
बुद्धं सरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला
फिटते भ्रांती मिळते शांती
फुलते जीवनकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

बोधिवृक्ष हे डुलती कैसे बांधाबांधावरी
गोड लागते साऊलीत या जीवनाची भाकरी
मळा हा राखू फळे हि चाखू
झरा बाजूला निळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

कोल्हेकुई हि कुपाकुपानं चाले बाहेरून
दुहीचा कुंदा वरती डोके काढितो आतून
हरेन्द्रासंग धरूया दोघं
हाती एकीचा विळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा