Tuesday, 31 December 2019

बुद्ध चरणी गं भीम चरणी गं नमावं वाटतं

***
सकाळच्या पारी 
बाई बुद्धाच्या विहारी
तिथं जाऊन सत्वरी
ध्यान लावून अंतरी
***
मला सकाळी गं, रोज विहारी गं
रमावं वाटतं
बुद्ध चरणी गं, भीम चरणी गं,
नमावं वाटतं

माझी श्रद्धा गं, भोळी भाबडी
जग म्हणतंय मजला वेडी
बुद्ध नामाची, भीम नामाची
माझ्या वेड्या जीवाला गोडी.
धम्मकार्यात भीमकार्यात 
मला श्रमावं वाटतं,
बुद्ध चरणी गं, भीम चरणी गं,
नमावं वाटतं

बाई बुद्धाच्या महामंत्रानी
जनजीवन फुलून गेलं
भीमरायानी त्याच मार्गानी
आम्हा बुद्धाचरणी नेलं
भिक्खू संघात
काशाय रंगात गमावं वाटतं
बुद्ध चरणी गं, भीम चरणी गं,
नमावं वाटतं

धीरा, तारा गं, संघमित्रा गं,
बुद्ध विहारात येवून
त्रिसरण गं, पंचशील गं,
रोज म्हणावं गोड गळ्यानं
शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात
जमावं वाटतं
बुद्ध चरणी गं, भीम चरणी गं,
नमावं वाटतं

अष्टांगाचा, मार्ग बुद्धाचा गं
मनात रुजला बाई
भीम करणीत फळ मुक्तीत
आता कमी कशाचं नाही
संग आनंदाच्या
गाणं भीमाचं गं, 
म्हणावं वाटतं
बुद्ध चरणी गं, भीम चरणी गं,
नमावं वाटतं

1 comment: