Friday, 9 November 2018

समाज विकणार नाही

नाही कधीच पटणार नाही, ही मनधरणी चतुराई
बोले ठासून भीम त्या ठायी, जावा जमायचं आपलं नाही
जावा जमायचं आपलं नाही
अशा दीड दमडीच्या पायी, माझा समाज विकणार नाही

शोधियले मी कित्येक धर्मस्थान
परी दिसले ना आमचे कुठे कल्याण
नको ही आता शाश्वती आणि
नको ही तुमची ग्वाही
आता नको ही तुमची ग्वाही

पाय उचलील तर करीन किल्ला सर हा
जर ना झाला तर मरेल आंबेडकर हा
अन् जगलो तर दावील जगाला
करून पर्वत राई
अन् करून पर्वत राई

मी पाहिले चाळूनी धर्मग्रंथ
त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ
त्या मार्गाने काशीनंदा
मुक्ती मिळे लवलाही
आता मुक्ती मिळे लवलाही
अशा दीड दमडीच्या पायी, माझा समाज विकणार नाही

Sunday, 12 August 2018

भीमा तुझ्या महूला जावून काल आलो

भीमा तुझ्या महूला जावून काल आलो
तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो

तू रांगलास जेथे तेथेच मान झुकली
ती धूळ मी कपाळी लावून काल आलो

आई तुझी भिमाई सातारलाच गेली
तेथेही दोन अश्रू वाहून काल आलो

जाऊन दूरदेशी तू आणली शिदोरी
मी त्यातलीच काही खाऊन काल आलो

दिल्लीतला खजिना तू वाटणार होता
तेथे तुझेच पाणी दावून काल आलो

दीक्षाभूमी सभोती हर्षाने दाटलेली
नागांची नागनगरी पाहून काल आलो

ते जाळणार होते मी टाळणार होतो
वामनसहित तेथे जाऊन काल आलो

स्वर: कृष्णा शिंदे

Sunday, 29 July 2018

नवकोटीचा राजा

नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मासम्बुद्धस्स
नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मासम्बुद्धस्स
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि

राजा, नवकोटीचा राजा
दयाळू दाता माझा
दयाळू दाता माझा आज पूजा गं

पोरं पिंपळपारावर
राजगृहापरी सुंदर
ध्यानस्थ आसनावर
बसविला भीमभास्कर
दर्शनास नारी-नर, येतील गडे दिनभर
लगबगीनं तुम्ही जा जा
लगबगीनं तुम्ही जा जा, जा पूजा गं

ज्याने रूढी बंधनातून
काढिले तुम्हा ओढून
आठवून तयाचे ऋण
व्हा मुक्त तुम्ही त्यातून
गाऊन तयाचे गुण, टाकावे गाव गर्जून
ही अशीच आरती गा जा
ही अशीच आरती गा जा, जा पूजा गं

जावून स्मारकाकडे
जा पूजा पहा ती गडे
कशी रास फुलांची पडे
दरसाल पुण्य एवढे
वर्षात दोनदा घडे, जा रांग लावण्या पुढे
फुलहार घेऊनि ताजा
फुलहार घेऊनि ताजा, जा पूजा गं

गीत:
गायक: श्रावण यशवंते

अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा

करून करणी दिपवली धरणी
भयान रात होती जेव्हा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा

अन्यायाची सुरी धरी माणूस माणसावरी
असली दादागिरी पाहुनी भीम पेटला उरी
तयार झाला रणी उतरला, गर्जत सिंहाचा छावा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा

नरकातून ह्या निघा जगा माणूस म्हणुनी जगा
कपटी जुलमी जगा त्यागुनी, पावन जीवन बघा
नाही हादरला सांगत फिरला धडाडीने गावोगावा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा

त्या भगवंतापदी लीन तो झाला सर्वाआधी
जन हे लक्षावधी टाकिले नंतर ओटीमधी
हीन-दीनाना दुःखी जीवांना, दिला सुखाचा हा ठेवा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा

ह्या वस्तीला धनी हजारो वर्षे नव्हता कुणी
आला भीम-नरमणी टाकिली नगरी हि बदलुनी
लक्ष्मणा ही करणी पाही, जग सारं करतंय वाहवा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा

गीत:
गायक: श्रावण यशवंते

Tuesday, 24 July 2018

कोहिनूर भारताचा

होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा 
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा 

जीवनपथास उजळे होऊनि दीपस्तंभ 
प्रबुद्ध बौद्ध करण्या केला इथे आरंभ 
उज्ज्वल भविष्यासाठी झिजला तो देह त्यांचा 
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा 

पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची 
सदैव दूरदृष्टी दृढनिश्चयी भीमाची 
बाबांचा मानी पिंड बुद्धीच्या सागराचा 
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा 

ग्रंथात ग्रंथरूपी राही अमर तो आज 
विष्णू कधी ना लोपे प्रगल्भ भीमराज 
गुणवान पूज्य ठरला आदर्श गौतमाचा 
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा 

गीत: विष्णू डांगे 
गायक: शाहीर विठ्ठल उमप