Tuesday, 24 July 2018

कोणी नाही भीमासारखा

ह्या संसारी दलितोद्धारी
महाउपकारी, झाला अमुचा सखा
कोणी नाही भीमासारखा...

पडीक भूमी जीवन अमुचे
कुणी कसेही तुडवित होते
मालक झाला त्याच भूमीचा
भूषविले ते मंगल नाते
तन मन कसूनी, बीज रुजवुनी
पिकवूनी गेला पिता...
कोणी नाही भीमासारखा

जातीयतेच्या अंधारातून
खंबीरतेने पुढे निघाला
करुनिया विद्येची साधना
विद्वत्तेचा पंडित झाला
थोर किती तो, घटनापती तो
तया तुम्ही ओळखा...
कोणी नाही भीमासारखा

बुद्धप्रणाली अंगीकारून
संघटली ती शक्ती मोठी
पंचशीलेने केले पावन
पिडलेले जन कोटी कोटी
हे विजयाचे, कार्य तयाचे
आता तरी पारखा...
कोणी नाही भीमासारखा


Friday, 6 July 2018

सोनियाची उगवली सकाळ

सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीमबाळ

भिमाई माता प्रसूत होता
हर्षित झाले ते रामजी पिता
धन्य झाली कुळी सकपाळ
जन्मास आले भीमबाळ

तारीख चौदा एप्रिल माहे
महूगावात हे वारे वाहे
ठेंगणे भासे आभाळ
जन्मास आले भीमबाळ

रूप तेजस्वी चंद्रापरी ते
तळपत होते अवनीवरी ते
केला सुखाने प्रतिपाळ
जन्मास आले भीमबाळ

मोठा झाला शिकला सवरला
........  ...   पुढे तो ठरला
जीर्ण रुढीचा कर्दनकाळ
जन्मास आले भीमबाळ

सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीमबाळ

गायक: आनंद शिंदे




Wednesday, 27 June 2018

पिंपळाच्या पानावर

पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे
बोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे
किती घोर तपस्या ती, देहाचे वारूळ झाले
बुद्धगया अजंठा ही, साक्षात वेरूळ आले
अष्टगाथा मंगलमय ते, पावित्र्य गौतमाचे
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे...1
या सावलीत माझ्या, विश्वाची माऊली ती
ह्रदयात मानवाच्या, धम्मज्योत लाविली ती
जग जिंकूनी झाले, ते मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे...2
कधी केला नाही गर्व, ना वाद कधी केला
तरी देश आज म्हणतो, मी बुद्धाचा चेला
बुद्धाने बुद्ध पाहे, सचित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे...3
लिहिले कुठेच नाही, हा माझा धम्म आहे
निर्वाणपदानंतर, या जगी स्तुप आहे
भिमदुतास कळले ते, सन्मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे...4

बोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे..
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे

गायक : प्रल्हाद शिंदे 
शब्दरचना :

Friday, 15 June 2018

माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं तळ्याचं

माझ्या खंबीर नेत्यानं, पाणी चाखलं तळ्याचं
त्यानं जीवाच्या पल्याड, केलं राखण मळ्याचं

बोधिसत्त्वाच्या तत्त्वाचं, खत टाकीलं मळ्यात
त्याला कुंपण घातीलं, बुद्ध धम्माच्या आळ्याचं 

बोध-अमृत शिंपून, मळा फुलविला त्यानं 
नव जीवन घडविलं, कोटी फुलांचं कळ्यांचं 

अष्टशीलाच्या कुपीत, असे भांडार ज्ञानाचं 
भाग्य जागवी क्षणात,  दीक्षाभूमीच्या खळ्याचं  

साऱ्या विखुरल्या फांद्या, पानं लागली गळाया 
नाही कुणी आता उरलं, भीमरायाच्या लळ्याचं 

नवकोटीच्या संगतीनं, राजगुरुनं गळ्यात
बघा ताईत बांधीलं, भीम बुद्धाच्या नावाचं 

**************************************
गीत: लक्ष्मण राजगुरू
गायक: कृष्णा शिंदे

Thursday, 14 June 2018

गौतमाचे चरणी फूल वाहिलेले

गौतमाचे चरणी फूल  वाहिलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

दिनी पौर्णिमेच्या बोधीवृक्षाखाली
बुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आली
ज्ञानियामुळे अवघे विश्व जागलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

दुःख मानवी सारे बुद्धास कळले
राज्यत्याग करुनी सत्यमार्गी वळले
तयांच्यामुळे विश्व-युद्ध टळलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

दीन-दुःखितांना सवे घेऊनिया
दया-क्षमा-शांती मंत्र देऊनिया
उद्धरले बुद्ध-मार्गी चाललेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

त्रिशरण पंचशीला अष्टांग मार्ग
विश्वकल्याणाचा दावी सन्मार्ग
सत्यशील उद्धारक धम्म निवडलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

गौतमाचे चरणी फूल  वाहिलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

गायक: कृष्णा शिंदे