Monday, 9 March 2020

एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर


दोनच राजे इथे गाजले,
कोकण पुण्यभूमीवर,
एक त्या रायगडावर,
एक चवदार तळ्यावर

रायगडावर शिवरायांचा 
राज्याभिषेक झाला,
दलितांनी दलितांचा राजा 
महाडी घोषित केला.
असे नरमणी दोन शोभले 
दोन्ही वीर बहाद्दर.
एक त्या रायगडावर,
एक चवदार तळ्यावर

शिवरायांच्या हातामध्ये 
तलवार भवानी होती,
त्याच भवानीपरी भीमाच्या 
हाती लेखणी होती.
निनादले दोघांच्या नावे
कोकणातले डोंगर.
एक त्या रायगडावर
एक चवदार तळ्यावर

शिवरायाने रयतेचा जो
न्यायनिवाडा केला 
तोच निवाडा भीमरायाच्या 
घटनेमध्ये आला
प्रतापसिंगा परंपरेला 
दोन्ही मारती ठोकर,
एक त्या रायगडावर,
एक चवदार तळ्यावर

दोनच राजे इथे गाजले,
कोकण पुण्यभूमीवर,
एक त्या रायगडावर
एक चवदार तळ्यावर.

No comments:

Post a Comment