Saturday, 26 August 2017

जग बदल घालुनी घाव

जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव ।।

गुलामगिरीच्या या चिखलात । रुतून बसला का ऐरावत ।
अंग झाडुनी निघ बाहेरी । घे बिनीवरती धाव ।।

धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।
मगराने जणू माणिक गिळिले । चोर जाहले साव ।।

ठरवून आम्हा हीन कलंकित । जन्मोजन्मी करुनी अंकित ।
जिणे लादुनी वर अवमानित । निर्मून हा भेदभाव ।।

एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चल बा पुढती ।
नव महाराष्ट्रा निर्मून जगती । करी प्रकट निज नाव ।।

गीत: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

4 comments: