Sunday, 23 April 2017

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते

वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते

गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते

तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते

सद्भाव एकतेचे जर अन्तरात असते
तुटले कुणीच नसते सारेच एक असते

वामन, समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया नीतीप्रमाणे सारेच नेक असते

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते

---लोकशाहीर वामनदादा कर्डक

समाजाचं काय

तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय
समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय

तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी
राहायला माडी तुला बसायला गाडी
सांग तुझा धंदा असा आहे तरी काय
समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय

काम नाही धाम नाही सकाळी उठुनी
सुख तुला सारं गड्या येतंय रं कुठुनी
सांग तुझा छंद असा आहे तरी काय
समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय

तुझ्यासाठी तुझ्याकडं सारं काही हाय रं
माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय रं
पुसते रोज वामनला वामनची माय
समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय

---लोकशाहीर वामनदादा कर्डक

Sunday, 16 April 2017

चंदन वृक्षासमान होता

चंदन वृक्षासमान होता, भीमराव झिजला
जीवननौकेचा तो अमुच्या, दीपस्तंभ ठरला

स्वानुभवाने दुःखे अमुची, जाणूनिया घेतली
विद्रोहाची फुले तयाने, करात आमुच्या दिली
संघटनेचा संघर्षाचा कानमंत्र हि दिला

महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले
महाडात ते तळे तयाने बंधमुक्त करविले
वैषम्याच्या बुरुज तटाला, सुरुंग हि लाविला

बहुज हिताय बहुजन सुखाय घटना नव निर्मिली
न्याय बंधुता समता नीती, तत्त्वे प्रतिपादिली
स्त्री-शुद्राच्या कल्याणाचा, कायदाच घडविला
जीवननौकेचा तो अमुच्यादीपस्तंभ ठरला


शिल्पकार जीवनाचा भीम माझा

शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे
रंजल्या न् गांजल्यांचा दीनदाता होता रे

फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर
दुबळ्यांच्या दुःखाची केली रे कदर
आभाळागत छाया झाली स्वाभिमान दाता रे

खचलेल्या माणसाला ताठ त्याने केले
शोषितांच्या अस्मितेला खतपाणी दिले
उंचावली मान, नाही वाकणार आता रे

आसवांना दिली तू हक्काची रे भाषा
घटनेत जागविली न्यायाची रे आशा
बाणा तुझा होता न्यारा भाग्यविधाता रे

--- रमेश थेटे

आचाराविण विचार वाया...बोध हा बुद्धाचा तू जाण

आचाराविण  विचार वाया, व्यर्थ असे ते ज्ञान
बोध हा बुद्धाचा तू जाण

पंचशील अन प्रज्ञा करुणा
मनुजांचे हे भूषण जाणा
त्रिशरणाला असे जीवनी, आहे अग्रस्थान

अष्टमार्ग हे अतीव सुंदर
अनुपम आहे या अवनीवर
मर्म जाणुनी या मार्गाचे, साधावे निर्वाण

जीव तेवढे समान सारे
मनी असावा भाव असा रे
त्या जीवांचे दुःख हरावे, सेवा हीच महान
बोध हा बुद्धाचा तू जाण

क्रांतिवीर महापुरुष जन्मा आले धरतीवर

क्रांतिवीर महापुरुष जन्मा आले धरतीवर
भीमराव आंबेडकर,
धन्य ते भीमराव आंबेडकर

सन अठराशे एक्याण्णव साली भीमराव जन्मले
दलितजनांचे भाग्य उजळले, कैवारी लाभले
कायदेपंडित शिल्पकार हि घटनेचा गाजतो
भीमरायाचा कीर्ती-डंका चौमुलखीं वाजतो
ध्येयवादी अन मुत्सद्दी, स्वाभिमानी नर

काळ्या रामाचे मंदिर नव्हते दलितांसाठी खुले
वाट काटेरी झाली मोकळी भीमरायाच्यामुळे
अस्पृश्यतेची रात संपली तेज नवे फाकले
महाडच्या चवदार तळ्याचे पाणीही चाखले
दीक्षा दिधली अन उद्धरला कोटी जनसागर

बहुजनांच्या हितासुखाचा भार वाहिला शिरी
ऋण तयांचे राहतील नवकोटी जनतेवरी  
एकोणीसशे छप्पन साली सहा डिसेंबर दिनी
महापरिनिर्वाण जाहले राहिल्या आठवणी
ज्ञानेश ऐसा होणार नाही शोधुनिया जगभर

भीमराव आंबेडकर,
धन्य ते भीमराव आंबेडकर

विजयादशमी दिनी

श्री बुद्धाच्या चरणावरती, विजयादशमी दिनी
दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनीं

मूळ गाडण्या विषमतेचे, मार्ग असा वेचला
मानवतेचा अन समतेचा धर्म नवा घेतला
श्री बुद्धाच्या महामंत्राचा, निनादला तो ध्वनी

थोर भाग्य हे दलित जनाचे भीमरत्न लाभले
व्यथा तयाची दूर जाहली, कार्य महा साधले
सोने लुटूनी मांगल्याचे लोक हर्षले मनी

कितीक झाले या अवनीवर, संत मुनी ज्ञानी
करू न शकले आजवरी ते, केले भीमाने झणी
उद्धरली नवकोटी जनता, रूढी मोडुनी जुनी
दीक्षा आम्हा दिली भीमानेमंगल दिन तो जनीं