Thursday, 4 March 2021

रात्र वैर्‍याची आहे

रात्र वैर्‍याची आहे, झोपेतून जाग आता
भिमाच्या सैनिका जपून वाग आता 


किती कष्टाने फुलविली भिमाने ही अमराई
भिमाच्या पाठी आता वाली कोणीही नाही
कशी करपून चालली भिमाची बाग आता
भिमाच्या सैनिका जपून वाग आता

लाचार कुत्र्यापरी गोंडा कोठे घोळू नको
स्वार्थासाठी समाजाशी खेळ खेळू नको
जग तू एक दिवस होऊनि वाघ आता
भिमाच्या सैनिका जपूनि वाग आता

तुपाच्यासाठी वेड्या उष्टे कधी खाऊ नको
संधीसाधूंच्या मागे वेड्या कधी जाऊ नको
नको लावूस तू कुळाला डाग आता
भिमाच्या सैनिका जपून वाग आता

किती नुकसान झालं आपल्यामधल्या बेकीनं
संदीप भटकू नको, रहा आता एकीनं
उरावी किर्ती तुझी, कार्याला जाग आता
भिमाच्या सैनिका जपून वाग आता